नंदुरबार l प्रतिनिधी
संपुर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शांतीदुत साधकांसाठी नंदुरबार नगर पालिकेच्या माध्यमातून नंदनगरीत भव्य ओम शांती भवन उभारण्यात येईल.गतकाळात काही तांत्रिक अडचणी होत्या.मात्र आपल्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि रघुकुल रीत सदा चली आयी प्राण जाये पर वचन ना जाये यानुसार लवकरच नंदुरबार शहरात भव्य दिव्य ओम शांती भवन साकारण्यात येईल. असे अभिवचन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले.

राजस्थान राज्यातील माउंट आबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी तपस्विनी बालब्रह्मचारींणी दादी रतनमोहिनी यांच्या शुभाशिर्वादाने नंदुरबार आणि शहादा येथील 12 बालब्रह्मचारींणी कन्यांचा समर्पण सोहळा नुकताच नंदनगरीत पार पडला. शहरातील सिंधी कॉलनी भागातील गुरुनानक मंगल कार्यालयात आयोजित समर्पण सोहळ्याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी,माजी नगरसेवक मोहन खानवाणी उपस्थित होते.
विश्व कल्याणासाठी स्वतः आणि कुटुंबांच्या इच्छेनुसार जिल्ह्यातील बारा बालब्रह्मचारींणी कन्यांनी समस्त जीवन भगवान शिव आणि ओम शांती परिवारासाठी समर्पित केले आहे. सर्वप्रथम जयचंद नगर येथील ओम शांती केंद्रातून सजविलेल्या वाहनाद्वारे डीजेच्या तालावर भक्ती गीतांसह फेटेधारी समर्पित 12 कन्या यांची नववधूप्रमाणे सजवून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.कोरीट नाका, गिरी विहार गेट, तहसील कार्यालय मार्गे सिंधी कॉलनीतील गुरुनानक मंगल कार्यालय येथे मिरवणूक पोहोचली.
या समर्पण सोहळ्यात शालेय विद्यार्थिनी आणि महिला भगिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भाविकांचे लक्ष वेधले.भगवान शिवबाबा यांची आराधना करीत ओम शांतीचे प्रतिक शिव ध्वज नृत्याने सर्वांची प्रशसा मिळविली. व्यासपीठावर भगवान शिवलिंग पिंड तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आली होती.या शिवपिंडीभोवती 12 कन्यांनी प्रदक्षिणा घालूनअध्यात्मिक मार्गावर समर्पित झाल्या.समर्पण सोहळ्याचे आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या शहादा केंद्र संचालिका बीके विद्या दीदी आणि नंदुरबार केंद्र संचालिका बीके विजयादीदी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मकुमारी बंधू-भगिनींनी केले.
या अनोख्या सोहळ्यासाठी नंदुरबारसह शहादा, तळोदा, निझर तसेच चोपडा, दोंडाईचा, धुळे येथील साधक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समर्पण सोहळा यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नंदुरबार शाखेसह सर्व साधक बंधू-भगिनींनी सेवा देऊन कार्य यशस्वी केले.