नंदुरबार l प्रतिनिधी
मणिपूर राज्यात आदिवासी जन समुदायावर होत असलेल्या अत्याचारविरोधात आज बुधवार दि.२६ जुलै रोजी नंदुरबार जिल्हा बंदची हाक विविध संघटनांतर्फे देण्यात आली आहे.
मणिपूर राज्यात मुळ आदिवासी समुदायावर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अत्याचार सुरु आहे. त्यातच दोन आदिवासी महिलांवर झालेल्या घोर अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दोघा महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याने आदिवासी समुदायाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच आदिवासींवर अन्याय, अत्याचाराच्या विविध घटना देशभरात घडत आहेत.
आदिवासींचे आरक्षण खोट्या आदिवासींद्वारे पळविण्यात येत असून आदिवासींचे सांविधानिक हक्कावर अतिक्रमण करण्यात येत आहे. मणिपूर येथील अमानवीय दुष्कृत्य व अत्याचारचा जाहीर निषेध करण्यासाठी समस्त आदिवासी समुदायातर्फे आज बुधवार दि.२६ जुलै रोजी नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व तालुके व बाजारपेठा बंद करण्याचे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.