नंदुरबार| प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यात दोन गटांसाठी २४ तर एका गणासाठी चार उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. पैकी आज जिल्हा परिषदेच्या गटासाठी १७ तर पंचायत समितीच्या तीन इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली.त्यामुळे जि.प.च्या दोन गटांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.कोराई गणात तीन उमेदवारांनी नामांकन माघारी घेतल्याने शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडुन आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी खापर व अक्कलकुवा या दोन गटांसाठी तर तालुक्यातील कोराई गणासाठी पोटनिवडणुक प्रक्रिया सुरू आहे. आज दि.२७ रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी खापर गटातून ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी रमेश भूषण कामे, डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत, ललित जगदिश जाट, आमश्या फुलजी पाडवी, मंगलसिंग कोमा वळवी यांनी आपले नामांकन मागे घेतले त्यामुळे खापर गटात कॉंग्रेसतर्फे गिताबाई चांद्या पाडवी, भाजपातर्फे नागेश दिलवरसिंग पाडवी या दोघांमध्ये समोरासमोर लढत होणार आहे तर अक्कलकुवा गटासाठी सर्वाधिक १७ नामांकने दाखल करण्यात आले होते. पैकी रजिया बेगम मोहम्मद रफिक खाटीक, छायाबेन जितेंद्र चव्हाण, उषाबाई अमृत चौधरी, लक्ष्मी मनोज जैन, तबसुमबानो मोहसीनअली मक्राणी, फराहाणा सुफीयान मक्राणी, फिरोजाबी मक्राणी, बारीद बानो मक्राणी, ज्योती संदिप मराठे, सुनिता विश्वास मराठे, सलमा मोहम्मद जमील शेख, हशमी गुलनाज सलाउद्दीन या १२ जणांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे अक्कलकुवा गटात भाजपातर्फे वैशाली कपिलदेव चौधरी, राष्ट्रवादीतर्फे रेहाना बानो मोहसीन मक्राणी, कॉंग्रेसतर्फे सुरीयाबी अमीन मक्राणी, शिवसेनेतर्फे आशा पारस सोलंकी तर अपक्ष जानदेवी गुलाम कादर बलोच हे पाच उमेदवार अक्कलकुवा गटासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
कोराई गणातून शिवसनेचे खाते उघडले
अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गणात चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी सबु अंबर तडवी, मालती लक्ष्मण नाईक, इंदिराबाई तेडग्या वसावे यांनी आज नामांकन माघारी घेतल्याने शिवसेनेच्या अश्विनी दिलीप वसावे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्या विजयी झाल्या आहेत.