नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील चौपाळे फाट्याजवळ आयशरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला.तसेच एकाला दुखापत झाली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथील मोहंमद बाबुलाल शेख याने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन (क्र. एम.एच. २० ईजी ३६६४) नंदुरबार-दोंडाईचा रस्त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून चौपाळे फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीला (क्र.एम.एच.३९- ३५८७) धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात साहील संतोष ठाकरे (वय २०, रा.चौपाळे ता.नंदुरबार) याचा मृत्यू झाला. तर शंकर रमेश ठाकरे यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत ईश्वर रमेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात मोहंमद बाबुलाल शेख याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देविदास नाईक करीत आहेत.








