नंदुरबार | प्रतिनिधी-

घरगुती वादातून पत्नीचे तोंड ओढणीने बांधून तिला जबर मारहाण करून खून केल्याची घटना पाचंबा, ता. नवापूर येथे १ जुलै रोजी पहाटे घडली. याप्रकरणी नवापूर पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधा सोनारसिंग वळवी (५०, रा. पाचंबा, ता. नवापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. तर सोनारसिंग साकऱ्या वळवी (५३, रा. पाचंबा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. वळवी पती पत्नीमध्ये नेहमीच कुरबूर होत होती. ३० जून रोजी मध्यरात्री ते १ जुलै रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान सोनारसिंग याने पत्नी राधा यांचे तोंड ओढणीने बांधले. तोंड घट्ट बांधल्यानंतर जाड दोराने संशयिताने जबर मारहाण केली. यात, राधा यांचा मृत्यू झाला.
याबाबत नवापूर पोलिसांना पोलिसात कळविण्यात आले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत वनिता नितेश वळवी (२७, रा. पाचंबा) यांनी फिर्याद दिल्याने सोनारसिंग वळवी यांच्याविरुद्ध नवापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मनोज पाटील करीत आहे.









