नंदुरबार l प्रतिनिधी
शहरात असलेला टिपू सुलतान नावाचा फलक प्रशासनाने त्वरित काढावा अशी मागणी भाजपा प्रदेश महामंत्री तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, युवराज राजपूत उपस्थित होते.
यावेळी विजय चौधरी म्हणाले की, ज्या टिपू सुलतान ने आपल्या देशावर आक्रमण केले. महिलांवर अत्याचार केले . मंदिर पाडले देवांची विटंबना केली असा टिपू सुलतान आमच्या देशाच्या , राज्याच्या , गावाच्या आदर्श होऊ शकत नाही. त्याच्या नावाच्या फलक त्वरित काढावा अशा मागणीसाठी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत.
पुढे म्हणाले की, टिपू सुलतान यांचे स्टेटस ठेवण्यावरून राज्यातील अनेक शहरांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच धुळे शहरातील वडजाई रोड चौफुलीवर कुठलीही परवानगी न घेता टिपू सुलतानचे स्मारक उभारले होते.मात्र तणाव टाळण्यासाठी ज्यांनी स्मारकासाठी पुढाकार घेतला होताच त्यांनीच स्वत:हून पुतळा काढून घेतला. धुळे येथील टिपू सुलतानचे स्मारक काढले आहे.
विशिष्ट समुदायाच्या लोकांनी टिपू सुलतान च्या फलकाचे भांडवल करू नये. कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी तसेच शहरात एकोपा , शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.









