नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, नंदुरबार व केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार यांचे मुंबई येथील पेटेंट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने कॉपीराइट:कायदे व विश्लेषण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून म्हणून पेटेंट ऑफिस मुंबई येथील पेटेंट परीक्षक प्रा.जसप्रीत कौर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात कॉपीराइट संबंधी कायदे, प्रक्रिया व त्याचे महत्त्व या मुद्यांवर सखोल मार्गदर्शन केले. कॉपीराइट आजच्या युगात किती महत्वाचे आहे हे देखिल त्यांनी विविध उधाहरणें देऊन स्पष्ट केले.
विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बौद्धिक संपदा अधिकार या क्षेत्रात एक उत्तम करियर करू शकतात असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी होते. या कार्यशाळेबद्दल आणि महाविद्यालयाच्या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन डी चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी पटेंट ऑफिस मुंबई यांच्या सहकार्याने महत्त्वाच्या विषयावर कार्यशाळा होत असल्याने आपल्या नंदुरबार सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. कायद्याचे विद्यार्थी आणि वकिलांसाठी बौध्दिक संपदा अधिकार या विषयावर अभ्यास काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ एस एस हासानी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे कार्यक्रम आयोजित करण्यात मला नेहमीच आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा.आ.चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी व सर्व संचालक मंडळाने प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.








