नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात मार्केट यार्ड मध्ये वर्षानुवर्ष कष्ट करणाऱ्या पित्याप्रती कृतज्ञता जपून नंदुरबार येथील जगताप बंधूंनी गाडीवान हमाल मापाडी गुमास्ता युनियन संघटनेला वैद्यकीय मदतीसाठी तब्बल दोन लाख रुपयाचा धनादेश देऊन समाजात नवा आदर्श घालून दिला आहे. यानिमित्त गाडीवान हमाल मपाडी गुमास्ता युनियनतर्फे किशोर जगताप आणि सुधीर जगताप या बंधूंचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करणत आला.
या अनोख्या उपक्रमाची माहिती अशी की ,सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी नंदुरबार मार्केट यार्डमधये हमालीचे काम करणारे मुळचे श्रीगोंदा (जिल्हा अहिल्या नगर ) येथील रहिवासी स्व. साखरचंद शंकरराव जगताप यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी त्यांच्या धर्मपत्नी विठाबाई साखरचंद जगताप यांनी पतीच्या वैद्यकीय खर्चासाठी हमाल कामगार बांधवांकडे मदतीची याचना केली.त्याप्रसंगी सर्व हमाल बांधवांनी संघटितपणे केलेल्या मदतीमुळे वैद्यकीय खर्च निभावला.
तब्बल 25 वर्षानंतर कै.साखरचंद जगताप यांचे दोन्ही सुपुत्र किशोर आणि सुधीर जगताप यांनी वडिलांप्रति कृतज्ञता जपत युनियनचे अध्यक्ष अशोक आरडे यांना भेटून कामगार बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी वडिलांच्या स्मरणार्थ दोन लाख रुपये देण्याची भावना व्यक्त केली.
या अनोख्या निर्णयाने प्रथम अशोक आरडे आश्चर्यचकित झाले.विशेष म्हणजे या देणगीबद्दल कुठेही गाजावाजा न करण्याची इच्छादेखील जगताप बंधूंनी व्यक्त केली.मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेल्या उदार देणगी दात्यांचा यथोचित सन्मान करण्याचा मानस अशोक आरडे यांनी केला होता. त्यानुसार स्व. साखरचंद शंकरराव जगताप यांच्या 25 व्या स्मृति दिनानिमित्त दि.19 जून रोजी हमाल मापाडी भवनाच्या सभागृहात ज्येष्ठ कामगार भागवत भील, नवनाथ चौधरी, नामदेव शिंदे तसेच अशोक आरडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी स्व.साखरचंद जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व कामगार व हमाल बांधवांनी श्रद्धांजली वाहिली.
शहरातील मनमोहन नगर भागात राहणारे किशोर व सुधीर जगताप बंधू आपल्या खाजगी वाहनांद्वारे शालेय विद्यार्थ्यांची ने- आण करतात.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील वडिलांच्या स्मरणार्थ कामगार व कष्टकरी बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी दोन लाख रुपयांची भरीव देणगी दिल्याबद्दल मार्केट यार्डसह समाजातील सर्व स्तरातून जगताप बंधूंचे कौतुक होत आहे. सत्कार सोहळा यशस्वीतेसाठी अशोक आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली
राजेश कदम, बाबुलाल पाटील, छोटू पाटील, अशोक सोपनार, योगेश शिंदे व सहकारी कामगारांनी परिश्रम घेतले.
मार्केट यार्डमधये काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय खर्चासाठी 11 हजार रुपयाची मदत करण्यात आली. यात दिनेश खांडेकर, मंगल वळवी, नारायण कदम, संजय चौधरी,कैलास कदम, हरी जगताप यांचा समावेश होता.या वर्षापासून प्रत्येक कामगारांकडून वार्षिक 200 रुपये वर्गणी घेण्यात येऊन उपक्रम सुरू ठेवणार आहोत.आता जगताप बंधूंच्या भरघोस देणगीमुळे मोठ्या आजारासाठी कामगारांना आर्थिक मदत होणार आहे.
– अशोक रावसाहेब आरडे,
अध्यक्ष गाडीवान हमाल मापाडी गुमास्ता युनियन, नदुरबार
आमच्या कुटुंबावर आलेला प्रसंग वैद्यकीय मदतीबाबत कोणावरही येऊ नये. या भावनेतूनच वडिलांच्या स्मरणार्थ कामगार बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.याबाबत इतरांनी प्रेरणा घ्यावी हाच उद्देश आहे.
– किशोर साखरचंद जगताप,
सुधीर साखरचंद जगताप, नंदुरबार








