नंदुरबार l प्रतिनिधी
परिविक्षाधीन सनदी अधिकारी तथा तहसीलदार पुलकित सिंह यांनी पुन्हा एकदा नंदुरबारात धडक कारवाईच्या बडगा उगारलेला आहे. काल त्यांच्या पथकाने शहरासह तालुक्यात अवैद्य पाणी उपसा आणि अवैद्य गौण खनिजांवर कारवाई केली.
मागील दोन महिन्याभरापूर्वी पुलकित सिंह यांनी नंदुरबार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळली होती. महिनाभराचा कालावधीत त्यांनी मोठमोठ्या कारवाया केल्याने ते अल्पावधीतच चर्चेत आले होते. नंदनगरीच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हे एवढ्या कमी कालावधीत कोणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी कारवाया केल्यामुळे त्यांनी शहरभर दरारा निर्माण केला होता. विशेष करून अतिक्रमणांवरील कारवाईच्या बडग्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते.
परिविक्षाधीन सनदी अधिकारी तथा प्रभारी नंदुरबार तहसिलदार पुलकितसिंह यांनी तहसिलदार पदाचा कार्यभार घेतल्यानंतर काल पुन्हा कारवाईचा धडाका लावला आहे. काल पुलकीतसिंह आणि पथकाने अवैध पाणी उपसा आणि अवैध गौण खनिजांवर कारवाई केली. यामुळे पुलकीतसिंह यांच्या नावाचा दरारा आता अवैध गौण खनिज
वाहतुकदारांमध्येदेखील दिसून येणार आहे. दरम्यान, काल नंदुरबार तालुक्यातील व शहरातील अनेक खासगी वॉटर फिल्डरधारक वाणिज्य वापरासाठी भूगर्भातून पाणी काढून विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने पुलकित सिंह यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे. सदर भूगर्भातून पाणी काढून व्यवसाय करणे तसेच सदर पाण्याचा स्त्रोत कमी होवून टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे वॉटर फिल्डरधारक केंद्रीय भूजल
प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करतात किंवा अनाधिकृत बोअरवेल तपासण्याचे त्यात अनियमितता आढळल्यास सदर बोअरवेल सील करणे व विद्युत पुरवठा बंद करणे तहसीलदारांना असल्याने काल त्यांनी बोअरवेलची तपासणी केली. यात सात बोेअरवेलचा वापर अवैधरित्या होत असल्याचे लक्षात आल्याने सदर आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
यामध्ये एस्सार पेट्रोल पंप परिसर, दंडपाणेश्वर मंदिर परिसर, करण चौफुली परिसर, बाबा रिसॉर्ट परिसर तसेच दोंडाईचा रस्ता परिसर भागातील वॉटर युनिटधारकांवर विना परवानगी वापर सुरु असल्याने सदरचे युनिट सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच नंदुरबार शहरासह विविध कॉलनीमध्ये ज्या-ज्या ठिकाणी वाळूचा साठा करून ठेवला आहे, अशा ठिकाणीदेखील त्यांनी भेट देत कारवाई केली. दरम्यान, वाघोदा शिवारात चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या पुढे परीविक्षाधीन सनदी अधिकारी पुलकितसिंह यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत कारवाई केली. यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.








