विसरवाडी l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे भरवस्तीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या करून दागिन्यासह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दि. १९ जुन सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एकाच वेळी तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या प्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विसरवाडी येथील शनिमंदीर परिसरातील कॉलनीत राहणारे शिक्षक एन. व्हि. वाघ हे दोन दिवस बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याचा फायदा घेत कुलुपाची कडी तोडून घरात प्रवेश केला घरातील तीन ते चार लाकडी व लोखंडी कपाटे, तिजोरी फोडुन बेडरुममध्ये पेटी पंलग, अंथरून इतर सामान अस्ताव्यस्त करून घरात असलेली रोख रक्कम व दागिने लंपास केले एकूण मुद्देमालाचा आकडा समजू शकला नाही तरी हजारोंचे एवज लंपास झाल्याची माहिती संबंधित घरमालकाने दिली आहे. तर पहिल्या घरफोडीतील शिक्षक एन व्ही वाघ यांच्या घराचे कुलूप हे घरापासून दोनशे मीटर लांब तिसऱ्या घरफोडीच्या ठिकाणी ग्रामपंचायत चौकात आढळून आले.
तसेच दुसरी घरफोडी ग्रामपंचायत परिसरात मागील गल्लीत राहणारे व्यवसायिक अनिल चौधरी यांच्या घरी कुलूप असल्याचा फायदा घेत कुलपाची कडी तोडून घरात असलेली दोन कपाटे फोडली असून सामान अस्तव्यस्त करून तिजोरीत असलेले सुनेचे सोन्याचे कानाची दागिने तसेच जुन्या व विशेष नंबर असलेल्या नोटांचा संग्रह करून ठेवलेली हजारोंची नोटा काही हजारोंची रक्कम लंपास करत तिसऱ्या घरफोडीचा पुढील मोर्चा ग्रामपंचायत पुढच्या गल्ली राहणारे शिक्षक दांपत्य नरेंद्र पगारे हे कुटुंबीयांसमवेत घरात वरच्या मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील दोन कपाटे व सामान अस्ताव्यस्त करुन हजारोंची रोख रक्कम लंपास केली आहे.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे हे पोलिस पथकासह दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून एकाच दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन चोरांनी या तिन्ही चोरीच्या घटना केल्याचे समजले असून तिन्ही ठिकाणी सारखेच दरवाज्याची कुलपाची कडी तोडल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य घेत परिसरात सीसीटीव्ही फुटेज तसेच चौकशी करीत पर राज्यातील आलेल्या एका विक्रेत्याला त्याची विचारपूस करीत माहिती जाणून घेत त्यास गावात व्यापार करण्यासाठी येण्यापूर्वी पोलीस ठाण्यात माहिती देणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले.