शहादा l प्रतिनिधी
घामाच्या धारा सोसल्यानंतर आता पावसाच्या सरींची वाट सर्वांनाच लागली आहे. अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरीही लावली आहे. आता अवकाळी पावसासोबत येणाऱ्या वादळ वाऱ्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची सावधानता बाळगावी, असे आवाहन शहादा महावितरणने केले आहे.
अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या उपकरणाने अपघात घडतात. वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्विचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे . मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात .
त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, पावसाळ्यात घरातील स्विचबोर्ड ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
अशी घ्या काळजी
घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी तसेच ईएलसीबी वापरावे. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्विच तत्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्विचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्विच बोर्डापासून बंद करावीत. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाच्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात, याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत किंवा विजेच्या उपकरणास दुचाकी टेकवून ठेवू नये.
प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा बंद
अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे.
टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था
वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय आहे तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागतो.
पावसाचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना उपकरणे हाताळताना काळजी घ्यावी . कुठे विद्युत तार कीवा पोल पडले असल्यास जनमित्र याना संपर्क करावा. कोणीही अशा धोकादायक वस्तूंना हात लाऊ नये असे महावितरण कडुन आव्हान करण्यात येत आहे .
अनिल झटकर
कार्यकारी अभियंता, शहादा








