मोलगी । वार्ताहर
बहुसंख्य गावांना सोईस्कर असलेल्या सावऱ्यादिगर ता. धडगाव येथील पुलाचे पंधरा वर्षापासून रखडले आहे. या रखडलेल्या बांधकामाची माजी मंत्री तथा आमदार ॲड.के.सी.पाडवी यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. दरम्यान ॲड.पाडवी यांनी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले, त्यामुळे त्यांची ही भेट पुलाचे काम पुर्ततेबाबत जनतेत आशा उंचावणारी ठरली.
नर्मदा नदीवरील सरदार सरोवरच्या भुगवट्यामुळे धडगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यात सावऱ्यादिगर गावाचाही समावेश आहे. सावऱ्यादिगर हे तीन राज्यांच्या सीमेवरील गाव असून त्याला लागून १७ खेडी आहेत. या खेड्यांसह अन्य गावांमधील नागरिकांच्या अडचणी वाढल्या, ही अडचण सोडवण्यासाठी २००७ मध्ये सावऱ्यादिगर येथे पुल मंजूर करण्यात आला. या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला २०१२ सुरुवात झाली.
मंजूरीच्या १५ वर्षांपर्यंत या पुलाचा केवळ पायाच उभा राहिला. या अर्धवट पुलाची आमदार ॲड. के.सी.पाडवी यांनी पाहणी केली. यावेळी माजी जि.प.सदस्य हारसिंग पावरा, संजय गांधी योजना समितीचे तालुकाध्यक्ष विक्रम पाडवी, तुकाराम पावरा, पंचायत समिती सदस्य ठाणसिंग पावरा, राड्या पावरा, छगन पावरा, शिवल्या पावरा, सरपंच दिलीप पावरा, सुरेश वळवी, सा.बां.विभागाचे उप अभियंता कुणाल पटले, शाखा अभियंता विशाल पावरा, भूषण चौधरी, सहायक अभियंता राजेंद्र पावरा, दिपक देसले, प्रमोद ठाकरे आदी उपस्थित होते.
पुलासाठी ३५ कोटींची आवश्यकता-ॲड.पाडवी
अतिदुर्गम भागातील १७ खेड्यांसह बहुसंख्य आदिवासी बांधवाना सर्वाधिक सोईस्कर ठरणाऱ्या सावऱ्यादिगर पुलासाठी ३५ कोटी आवश्यकता आहे. अपेक्षित निधी उपलब्ध झाल्यास येत्या काही कालावधीतच पुलावरुन स्वप्नवत प्रवास सुरू होईल. हा निधी मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनासह गुजरात व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार ॲड. के.सी.पाडवी यांनी पुलाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केले.
दूर झाला वन विभागाचा अडथळा
पुलाचे काम सुरु असतानाच २०१५ मध्ये वन विभागाने अडथळा आणत काम बंद पाडले. परंतु वन विभागाच्या कायदेशीर बाबींची आता पूर्तता झाली आहे, आता केवळ वाढीव निधीची प्रतिक्षा आहे. प्रतिक्षेतील निधी उपलब्ध झाल्यास तातडीने कामाला पुन्हा सुरुवात होईल. म्हणून बांधकाम साहित्यांच्या किंमतीतील वाढीनुसार नव्याने निधी मंजूर होणे नितांत गरजेचे असल्याचे आमदार ॲड.पाडवी यांनी सांगितले.








