नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ वितरीत होणार आहे. केंद्र सरकारने या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्याचे लाभ जमा करावयाच्या बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (जोडणे) व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही बाबी स्वतः लाभार्थीने परिपुर्ण केल्याशिवाय त्यास पुढील हप्ता वितरीत होणार नाही. ई-केवायसी पीएम किसान पोर्टलच्या www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावील शेतकरी कॉर्नर मधील ई-केवायसी या टॅब मधून ओटीपीद्वारे स्वत: लाभार्थ्यांना मोफत करता येईल.
तसेच लाभार्थी शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा केंद्रावर जाऊन आधार बँक खात्याला संलग्न करून घ्यावे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे पोस्टात कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. सदर बँक खाते 48 तासांत आपल्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा गावातील प्रत्येक पोस्टात उपलब्ध आहे.
याशिवाय पीएम किसान ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान जिओआय अॅप डाउनलोड करून फेस ऑथेंटीकेशन द्वारे करू शकणार आहेत. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीसाठी आपले आधारकार्ड घेवून सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई-केवायसी करावी. अडचण असल्यास नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.वाणी यांनी कळविले आहे.








