नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या दीड-दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षात आजपासून शाळा सुरू होत आहेत.शासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी सर्वच विद्यार्थ्यांचे तसेच नवीन दाखल पात्र विद्यार्थ्यांचे शाळेत वाजत गाजत,मिरवणूक काढत,गुलाब पुष्प देऊन स्वागत होत असताना श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी एक अभिनव उपक्रम संकल्पना राबवत शिक्षण,अध्यात्म, पर्यावरण व विज्ञान यांची सांगड घालून टाळ-मृदुंगाच्या गजरात,अभंगाच्या चालीवर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच शाळेचा पहिला दिवस हा सर्वांसाठी अविस्मरणीय असतो शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहाव्यात म्हणून लहानपणापासून पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे
यासाठी वृक्षदिंडी काढून व मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प ऐवजी वृक्षांची रोपे भेट म्हणून देण्यात येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश लहान वयात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला तसेच केक कापून व मोफत पाठ्यपुस्तक वितरण करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
हे अतिशय नाविन्यपूर्ण,कौतुकास्पद व वाखाणण्याजोगे आहे असे मत हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशू विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्याप्रसंगी जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
श्री.चौधरी पुढे म्हणाले की, दहा-वीस वर्षांपूर्वीची शाळेत प्रवेश करणाऱ्या बालकाची व पालकांची मनस्थिती व आज शाळेत प्रवेश करणाऱ्या बालकाची व पालकांची मनस्थिती यात पूर्णता बदल झाला असून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झपाट्याने झाल्याने शिक्षणाचे महत्त्व सर्वांना कळले आहे. लहान वयातच मुलांमध्ये शिक्षणाविषयी शाळेविषयी गोडी निर्माण झाली आहे.शाळेत आल्यानंतर ही गोडी विद्यार्थ्यांमध्ये कायम टिकून राहावी यासाठी G-20 सारखे उपक्रम मागील दहा दिवसांपासून जिल्हाभरात राबवले गेले. असेच विविध नवनवीन उपक्रम व संकल्पना तसेच कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवणे गुणवत्ता वाढीस लावणे यासाठी नेहमी शिक्षकांनी प्रयत्नशील असावे असे आवाहन देखील केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.अनिता शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षणासोबत सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असावे असे आवाहन केले.

उपस्थित प्रमुख मान्यवर सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल ए.आर.माळके यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व शुभेच्छा देत शाळेच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या शाळेच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले.
उपस्थित प्रमुख मान्यवर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी भावेश सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत आजचे युग हे स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांना एक यंत्र न मानता शाळेचा ,अभ्यासाचे कुठलेही दडपण ताण तणाव न देता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला गेला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
संस्थेचे सहसचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी यांनी प्रास्ताविकातून आजच्या कार्यक्रमाची संकल्पना तसेच नवीन शैक्षणिक वर्षातील रूपरेषा मान्यवर व विद्यार्थी यांच्यासमोर सादर केली.
कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री.चौरे,सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल पी. डी. पवार,श्रीमती एम.आर.मराठे,श्रीमती ए.डी.चव्हाण, श्रीमती एम.एस.बोरसे वनरक्षक श्रीमती सविता धनगर, युवराज महाले व ह.भ.प. कीर्तनकार रामकृष्ण महाराज भोणेकर व त्यांचे भजनी मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीष काटके व आभार प्रदर्शन युवराज भामरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती नैना सोनवणे,विशाल चौधरी,श्री शेखर पाटील,रवी चौधरी,सुधाकर ठाकूर आदींनी सहकार्य केले.








