नंदूरबार l प्रतिनिधी
अवैध दारूच्या वाहतूकीवर नवापूर पोलीसांची धडक कारवाई, 22 लाख 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पाच जण फरार झाले आहे.त्यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
दि. 12 जुन 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर, गुजरात राज्यातील व्यारा व चलथान येथील काही इसम एकत्र येवून चारचाकी वाहन (क्र. एम.एच. 20, ई.एल-3177) हीच्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली व दादरा- नगर हवेली आणि दिव व दमन येथे विक्रीसाठी असलेली विदेशी दारु अवैधपणे विक्री करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, चरणमाळ घाट, नवापूर मार्गे गुजरात राज्यात वाहतूक करणार आहेत. त्यावरून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना देवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.
मिळालेल्या बातमीच्या आधारे नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने चरणमाळ घाटाच्या पायथ्याशी सापळा रचला. चरणमाळ घाटाकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना 13 जुन 2023 रोजी पहाटे 4.30 वा. सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक काळ्या रंगाचे स्कॉर्पीओ वाहन भरधाव वेगाने येतांना दिसला, म्हणून पोलीस पथकातील अमंलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला.
वाहन चालकाने सदरचे वाहन नवापूर तालुक्यातील बोरझर फाट्यावर सोडून तीन इसम काळ्या रंगाच्या वाहनामध्ये बसून तेथून पळून गेले. सदरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 12 लाख 57 हजार 840 रुपये किमतीचे इम्पेरियल ब्ल्यू हॅन्ड ग्रीन व्हिस्की चे 301 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम. एल. च्या एकुण 14,448 नग काचेच्या बाटल्या. 1 लाख 02 हजार रुपये किमतीचे ऑल सिजन गोल्डन कलेक्शन रिसर्व व्हिस्कीचे 25 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम.एल.च्या एकुण 1200 नग काचेच्या बाटल्या. 3) 10 लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक (क्र. एम.एच. 20, ई.एल-3177)असा एकुण 22 लाख 57 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने
कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला असून वाहन सोडून पळून गेलेले तीन संशयीत आरोपी व काळ्या रंगाच्या स्कॉर्पीओ वाहनातील दोन आरोपी यांच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 83, 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील पाचही फरार संशयित आरोपीतांना लवकरच शोधून बेड्या ठोकण्यात येतील व त्यांचेविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, दिनेशकुमार वसुले, पोलीस अंमलदार दिनेश बाविस्कर, प्रशांत खैरनार, पवन काकरवाल, परमानंद काळे यांच्या पथकाने केली आहे.