नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुड्याच्या दुर्गम भागाता रस्ते नसल्याने येथील रहिवाशांच्या समस्या संपता संपत नाहीत.त्यातच आता रस्त्यांअभावी एका नवरदेवासह वऱ्हाडींना सुमारे २० किमीची पायपीट करावी लागल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील केवडीचा कोतवालपाडा येथील एका युवकाचा विवाह आंबापाडा येथील युवतीशी होणार होता.मात्र, आंबापाडा जाण्यासाठी रस्त्याअभावी वाहन नेणे शक्य नसल्याने केवडी ते जांगठी मार्गाने नवरदेवाला खांद्यावर घेत वऱ्हाडींनी चक्क २० किमीची पायपीट केली. दऱ्याखोऱ्यातील पायवाट तुडवित पहाटे निघालेले वऱ्हाड आंबापाडा येथील लग्नमंडपात घामाघूम होवून दुपारपर्यंत पोहचले.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील केवडीचा कोतवालपाडा येथील मिथुन वसावे या तरुणाचा आंबापाडा येथील एका तरुणीशी विवाह संपन्न झाला. पण, आंबापाडा जाण्यासाठी रस्ताच नसल्याने केवडी ते जांगठी मार्गे जाण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला. यामुळे भल्या सकाळी निघालेले नवरदेवाचे वऱ्हाड डोंगरदऱ्यातून पायपीट करत घामाघूम होवून दुपारपर्यंत आंबापाडा येथील लग्न मंडपापर्यंत पोहचले.
नवरदेवाला खांद्यावर घेत वऱ्हाडींनी चक्क २० किमीची पायपीट केली.विवाह आटोपल्यानंतर नववधू सोबत असल्याने वाहनाने जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कच्चा रस्त्याने जाता येईल असे वाहन आणण्यात आले. यानंतर सुमारे ३० ते ३५ किमीचा फेऱ्याने नवरदेव-नवरीला रवाना करण्यात आले. याबाबतचा व्हीडीओ सोशल मिडीयावरदेखील व्हायरल झाला आहे. या घटनेने मात्र जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवी वर्षातही दुर्गम भागात पोहचलेल्या विकासावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.








