नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा गावाजवळ वडाचे झाड कोसळून त्यात मृत्यू झालेल्या कारचालक राजेंद्र रोहिदास मराठे यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून तत्काळ चार लाखांचा धनादेश आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
जिल्ह्यात ४ जुन रोजी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता.दरम्यान तळोदा तालुक्यातील चिनोदा गावानजीक रस्त्यावर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळून प्रतापपूर येथील राजेंद्र मराठे (४८) यांचा झाडाखाली दबून मृत्यू झाला होता. राजेंद्र मराठे हे घरात एकटे कमावते असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे मराठे परिवाराचा संसार उघड्यावर आला होता. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत त्यांचा मृतदेह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आणण्यात आला होता.
यावेळी आमदार राजेश पाडवी, भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.. शशिकांत वाणी, सहायक मदत जिल्हाधिकारी मंदार पत्की, तहसीलदार गिरीश वखारे यांनी नातेवाइकांना व ग्रामस्थांना आश्वासित केले होते. तहसीलदार गिरीश वखारे यांनी तत्काळ कारवाई करीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून मराठे कुटुंबीयांना चार लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. सोमवारी सायंकाळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मराठे परिवाराला धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, प्रभाकर उगले उपस्थित होते.








