नंदूरबार l प्रतिनिधी
खा. अमोल कोल्हें यांचा पी.ए. च्या नावाने फसवणुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने त्र्यंबकेश्वर येथून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि. १ रोजी रात्री 11 वा. सुमारास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईलवरुन काम असल्याचा मेसेज आला. त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते यांना मदत करण्याबाबत सांगितले. त्याअनुषंगाने पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते यांनी त्या अज्ञात मोबाईल क्रमांकावर कॉल करुन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे नाव प्रबोधचंद्र सावंत असे सांगून ते खासदार अमोल कोल्हे यांचे पी.ए. असल्याबाबत कळवून त्यांच्या मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असून त्यांना मदत करणेबाबत सांगितले. त्यानंतर पी.एस.आय. हेमंत मोहिते यांना अज्ञात इसमाने फोन करुन सांगितले की, जखमींना रुग्णवाहिकेने शिवाजीनगर पुणे येथे घेवून जाणे असल्याने डिझेलसाठी व जेवनासाठी पैशांची मदत करावी असे सांगितले.
पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते यांनी अपघातग्रस्तांना मदत व्हावी या उद्देशाने फोन पे द्वारे त्यांना पैशांची मदत केली, परंतु पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते यांनी सकाळी अपघाताची माहिती घेतली असता नंदुरबार जिल्ह्यात अथवा आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील असा कोणताही अपघात झाला नसल्याचे समजले. त्यामुळे अनोळखी मोबाईल क्रमांकावर बोलणारे रविकांत मधुकर फसाळे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलीसांना अपघाताबाबत खोटी माहिती देवून फसवणूक केली म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 420,418 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अन्वये पोलीस उप निरीक्षक श्री. हेमंत मोहिते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अज्ञात मोबाईल क्रमांक धारक यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना आदेशीत करुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नाशिक व पालघर जिल्ह्यात रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या तांत्रिक मदतीच्या आधारे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याच्या मोरचंडी गावात जावून शोध घेत होते, परंतु पथकाकडे संशयीत आरोपीताचा फोटो किंवा इतर उपयुक्त माहिती नव्हती तसेच सदरचा परिसर डोंगराळ भाग असल्याने पथकास अडचणी येत होत्या. पथकाने मोरचंडी गावात जावून संशयीत इसमाचा शोध घेतला असता, सदरचा इसम त्या गावात राहत नसल्याबाबत समजुन आले. म्हणून पथकाने अधिक माहिती काढली असता संशयीत इसम त्र्यंबक येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्र्यंबक येथे जावून शोध घेतला असता तो त्र्यंबक जि. नाशिक येथे मिळून आल्याने रविकांत मधूकर फसाळे रा. मोरंडे पोस्ट मोरचंडी ता. मोखाडा, जि. पालघर यास ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याबाबत सविस्तर हकिगत सांगून मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्याच्या मोबाईलमध्ये अनेक राजकिय नेते, वरिष्ठ अधिकारी इत्यादींचे मोबाईल क्रमांक दिसून आले. संशयीत आरोपीतास त्याच्या ताब्यात मिळून आलेला मोबाईलसह गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाने आणखी कोठे या प्रकारचे गुन्हे केले आहेत का ? याबाबत देखील सखोल तपास करण्यात येत आहे, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार शोएब शेख यांच्या पथकाने केली आहे.








