नंदुरबार l प्रतिनिधी
पहिल्याच पावसात तळोदा तालुक्यात पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात ३५ बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सातपुडा पर्वत रांगेतील तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. तळोदा तालुक्यातील विहीरमाळ येथील शेतकरी गोमा समा पटले व त्यासोबत आणखी तीन ते चार शेतकरी जंगलात बकऱ्या चारायला गेले असताना. अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान मुसळधार पावसामुळे या शेतकऱ्यांच्या जवळपास 35 बकऱ्या जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पहिल्या पावसातील नैसर्गिक आपत्तीमुळे सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधन नुकसान झाल्याने महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.