नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील डोडवा येथील बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश आले आहे. दोन दिवसात दुसरा बालविवाह रोखला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 11 मे रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील डोडवा येथील एका अल्पवयीन मुलीचा गुजरात राज्यातील सेलंबा तालुक्याच्या गोटपाडा येथील एका तरुणासोबत १२ मे रोजी होणार आहे अशी माहिती मिळाली. सदरची माहिती त्यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांना कळवून पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती मार्फत सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करून कायदेशीर तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्याबाबत आदेशीत केले.
अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता डोडवा ता. अक्कलकुवा येथे एका ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असल्याचे दिसून आले. तसेच वधू मुलीचा गुजरात राज्यातील सेलंबा तालुक्याच्या गोटपाडा येथील एका तरुणासोबत निश्चित करण्यात आलेला असून १२ मे रोजी विवाह होणार असल्याचे समजले.
सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समितीच्या सदस्यांनी वधु मुलीचे आई-वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांकडे वधू मुलीच्या जन्म तारखेबाबत विचारपूस केली असता मुलीचे वय 15 वर्षे 02 महिने असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर अक्षता समितीने तेथे हजर असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत चर्चा केली. त्यानंतर अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत, अल्पवयीन मुलीचे आई-वडील, नातेवाईक असे गुजरात राज्यातील सेलंबा तालुक्यातील गोटपाडा येथे वर मुलाच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी व मुलाच्या पालकांना व नातेवाईकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलगी व मुलगा यांच्या नातेवाईकांना अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
सदर बालविवाह रोखण्यासाठी डोडवा ता. अक्कलकुवा व गोटपाडा ता. सेलंबा जि. नर्मदा गुजरात राज्य येथे गेलेल्या अक्षता समितीकडून तेथील उपस्थित गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून लोकांमध्ये बालविवाह विषयी जनजागृती करण्यात आली.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह थांबविण्यात पोलीसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत, पोलीस उप निरीक्षक जितेंद्र महाजन, पोलीस हवालदार उल्हास ठिगळे, महिला पोलीस नाईक कल्पना वसावे, पोलीस शिपाईक सतीश वळवी, दीपक पाटील अशांनी केली आहे.








