नंदुरबार | प्रतिनिधी
येथील एका सराफांच्या दुकानातून अंगठी खरेदी करुन बनावट मॅसेज तयार करुन ऑनलाईन पेमेंट केल्याचे भासवित सुवर्ण व्यावसायिकाची सुमारे ३९ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश जगदीश सोनार यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात देवल राजेंद्र शिंदे याने ६.८० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी खरेदी केली. सदर अंगठीचे पेमेेंट रोख देण्यासाठी पैसे नसून ऑनलाईन पेमेंट करणार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, त्याने बनावट मॅसेज तयार करुन अंगठीची रक्कम ऑनलाईन जमा केल्याचे भासविले व तेथून पोबारा केला.
पेमेंट जमा न झाल्याचे लक्षात आल्यानंतर गणेश सोनार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार देवल राजेंद्र शिंदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करत आहेत.