नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्गत केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतंर्गत आदिवासी स्वयंसहायता महिला बचत गटांना शेळी गट योजनेचा लाभ देण्यासाठी अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटाकडून 15 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेतंर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अथवा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे नोंदणीकृत व सद्यस्थितीत कार्यान्वित असलेले अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी स्वयंसहायता बचत गट अर्ज करु शकतात. गटाला प्रति युनिट 10 शेळी अधिक 1 बोकड देण्यात येईल.
शेळी गट व्यवसायासाठी लाभार्थी महिला बचत गट अनुसूचित जमातीचा असावा. बचत गट नोंदणीकृत असावा. महिला बचत गटातील एका सदस्याच्या नावे सातबारा उतारा असणे आवश्यक राहील. पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याचे ग्रामसेवकाचा दाखला, यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमून्यातील अर्जाचे वाटप प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि. नंदुरबार येथे 8 मे 2023 ते 15 मे 2023 या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून ) कार्यालयीन वेळेत वाटप केले व स्विकारले जातील, असे श्री. पत्की यांनी नमूद केले आहे.