नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सभापती अभिजीत पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 14 जागा जिंकून एक हाती विजय मिळवला आहे.तर विद्यमान सत्ताधारी दीपक पाटील यांच्या लोकशाही पॅनलला 3 तर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित पुरस्कृत बळीराजा पॅनल ला फक्त 1जागा मिळाली असून महाविकास आघाडीच्या पॅनलला शून्य जागा मिळाल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी तिरंगी लढत होती अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शुक्रवारी बंपर 96.82 टक्के मतदान झाल्यानंतर मतदार राजाने कौल कुणाला याबाबत संपूर्ण तालुक्यात चर्चा लागली होती.शनिवारी सकाळी आठ वाजेपासून तहसील कार्यालयातील सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली सर्वप्रथम व्यापारी मतदार संघाचा निकाल जाहीर करण्यात आला यात दोन्ही जागांवर दीपक पाटील पुरस्कृत लोकशाही आघाडीच्या पॅनलचे दोन्ही उमेदवार विजय झाल्याबद्दल समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना सभागृहातील वातावरण अचानक बदलले माजी जिल्हा परिषद कृषी सभापती अभिजीत पाटील पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवारांना स्पष्ट आघाडी मिळाल्यानंतर एकूण 11 पैकी दहा जागांवर विजय मिळाला तर दीपक पाटील यांच्या पुत्र मयूर पाटील हे अवघ्या आठ मतांनी विजयी झाले.
सोसायटी मतदार संघातील सात जागांसाठी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला होता यात लोकशाही पॅनलचे मयूर पाटील यांना विजय घोषित करण्यात आले होते या विरोधात शेतकरी विकास पॅनलच्या माधव पाटील यांनी फेर मतमोजणीचा अर्ज दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निरज चौधरी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पडल्या नंतर दोन्ही गटाच्या प्रतिनिधींना बोलावुन फेरीनिहाय मिळालेल्या मतांची पडताळणी केली.दोन्ही गटाच्या प्रतिनिधीची खात्री झाल्यानंतर मयूर पाटील हे आठ मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले. तर माधव पाटील यांनी आपला पराभव मान्य केला.
ग्रामपंचायत मतदार संघाच्या चारही जागांवर अभिजीत पाटील पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनल मिळाले पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व कृषी सभापती हेमलता शितोळे यांच्या बळीराजा पॅनलला केवळ हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेवर विजय मिळाला आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिबंधक नीरज भगवान चौधरी यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम बागल व सहाय्यक राजेंद्र पवार. व कुंती पाडवी यांनी कामकाज पाहिले.