नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा याकरीता पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील एकुण 7 इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 च्या प्राप्त अधिकारान्वये नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेले आहे. हद्दपार करण्यात आलेले सर्व 7 इसम हे नंदुरबार तालुक्यातील आहेत.
पोलीस अधीक्षक, पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती घेतली. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करुन नियमितपणे मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांच्यापासून सामान्य नागरिकांच्या मालमत्तेस व जिवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे त्यांना आढळून आले. त्याप्रमाणे अशा आरोपीतांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.
नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील 7 इसमांविरुध्द मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याकडून एक टोळीस हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला. सदर हद्दपार प्रस्तावाचा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आढावा घेवुन प्रस्तावाची छाननी केली. तसेच योग्य ती कायदेशीर प्रकिया पार पाडून 7 इसमांना 2 वर्ष कालावधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दि. 28 एप्रिल रोजी दिले आहेत.
अर्जुन भिला पवार रा. चाकळे ता. जि. नंदुरबार, सागर शिवनाथ पाडवी रा. चाकळे ता. जि. नंदुरबार, लखन बापु भिल रा. शनिमांडळ ता. जि. नंदुरबार, ज्ञानेश्वर वसंत मोरे रा. शनिमांडळ ता. जि. नंदुरबार, न्हानभाऊ भगवान भिल रा. शनिमांडळ ता. जि. नंदुरबार किरण मंगलसिंग भिल रा. तिलाली ता. जि. नंदुरबार विपुल सुरेश कोळी रा. तिलाली ता. जि. नंदुरबार यांना हद्दपार करण्यात आले आहे.
हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर 48 तासाचे आंत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघुन जाण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच हद्दपार इसमांनी नंदुरबार जिल्ह्यात येतांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुध्द् प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वरील 7 हद्दपार इसम नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसुन आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे कळवावे असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.