नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात गुजरात राज्यातील व स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या 1600 हेक्टर वनजमिनवर अतिक्रमण करून जमीन कसत होते.याविरोधात वनविभागाच्या पथकाने कार्यवाही करीत 1525 हेक्टर वनक्षेत्रावरील अतिक्रमण नष्ट करीत वनजमीन ताब्यात घेतली आहे.
नंदुरबार वनविभागातील वनक्षेत्र नंदुरबार (रोहयो) मधील नियतक्षेत्र सोनपाडा, भांगडा येथील राखीव वनातील अवैधरित्या गुजरात राज्यातील व स्थानिक लोकांनी सुमारे 1600 हेक्टर वनजमिनवर अतिक्रमण करुन पिकपेरा करुन कसत होते.
जिल्हाधिकारी श्रीमती. मनिषा खत्री, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील,उपविभागीय महसुल अधिकारी मिनल करनवाल, , आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तळोदा मंदार पत्की, नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी, नवापूर स्थानिक महसुल व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने भारतीय वन अधिनियम 1927अन्वये राखीव वनांसंबधी अतिक्रमण हटविण्याचे वनअधिकारी यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन या ठिकाणी अतिक्रमण निष्काषण मोहीम ही दि. 3 मार्च पासून पासुन सुरु करण्यात आली असून आता पर्यत कक्ष क्र. 27, 28, 29, 30, 31, 32 मधील 100 टक्के सुमारे 1525 हेक्टर वनक्षेत्रावरील अतिक्रमण नष्ट करुन यंत्राच्या सहाय्याने खोल सलग समतल चर खोदकाम करुन वनजमिन ताब्यात घेण्यात आली आहे.
सदर कार्यवाही ही उपवनसंरक्षक, नंदुरबार कृष्णा भवर, सहा. वनसंरक्षक (प्रा व वन्यजीव)धनंजय ग. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार (रोहयो) श्रीमती. स्नेहल सी. अवसरमल, वनपाल श्रीमती. प्रियंका निकुभे , वनरक्षक अरविंद निकम , किसन वसावे, कु. नयना हाडस , दिपक विभाडिक, रवि गिरासे, दिनेश वळवी व रुपेश वसावे, गस्ती पथक, नंदुरबार वनविभाग, वनक्षेत्र नवापुर प्रा., चिंचपाडा प्रा. यांच्या पथकाने केली आहे.
वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैध वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर 1926 या क्रमांकावर संर्पक साधुन माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन सहा. वनसंरक्षक धनंजय पवार यांनी केले आहे.