नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खटवानी येथे शेतातील घर जळून लाखोंचे नुकसान झाले असून शेतातील कापूस, गहू व इतर धान्य लाकडे जळून खाक झाल्याची घटना घडली
अक्कलकुवा तालुक्यातील खटवानी गावातील रहिवासी उकड्या जेमा वसावे यांच्या शेतातील घराला दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागून घरातील सर्व साहित्य धान्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. घरमालक उकड्या जेमा वसावे हे जवळच्या गावात अंत्यविधी कार्यक्रमाला गेले होते. तर त्यांची पत्नी दुसऱ्या शेतावर गेली असताना घरात कोणीही नव्हतं त्यावेळेस घराला आग लागली अशी माहिती उकड्या जेमा वसावे यांच्या पत्नीने दिली आहे.
शेतातल्या घराला आग लागल्याच्या दरम्यान जवळपास कोणीही नव्हतं त्यामुळे विजविण्यासाठी कोणताही प्रयत्न झाला नसल्याने. घरातील संसार उपयोगी वस्तू, धान्य, कपडे, घरगुती सामान, तसेच विक्रीसाठी काढून ठेवलेला कापूस व गहू व इतर धान्य आगीमध्ये जळून खाक झाल्याने शेतकरी परिवाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातल्या घरात मोठ्या प्रमाणावर घराच्या लाकडी दांड्या व खांबे होते ते देखील जळून खाक झाले आहे.
महसूल विभागाच्या वतीने आगीत नुकसान झालेल्या घटनेचा तपशील नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.








