नंदुरबार l प्रतिनिधी
एप्रिल अर्धा उलटत आला असून एप्रिल हिटचा तडाखा जाणावायला सुरुवात झाली आहे. काल नंदुरबार शहरात 41 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे पोहचला आहे. यामुळे आगामी दिवसांमध्ये पारा आणखीन वाढणार असून या कालावधीत नागरिकांनी उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
एप्रिल महिना अर्धा उलटला आहे. तसा तापमानाचा पारा देखील आता चढता दिसून येत आहे. काल यंदाचे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात काल कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27.5 अंश सेल्सिअस होते. एप्रिल महिना अर्धा होण्यापूर्वीच तापमानाच्या पाऱ्याने चाळीशीच्या पुढे गेल्याने आगामी दिवसांमध्ये यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे उष्माघाताचा संभाव्य त्रास लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याची गरज नर्मिाण झाली आहे.
यामुळे वाढते ऊन लक्षात घेऊन नागरिकांनी सकाळी अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना कामे करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे वापरु नयेत. पांढरे कपडे वापरावेत. भरपूर पाणी प्यावे. लिंबू शरबत प्यावे. रिकाम्या पोटी ऊन्हात जावू नये. कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. यासारखे प्रतिबंधात्मक उपायकरणे गरजेचे आहे. वाढत्या ऊन्हाच्या पार्श्वभूमीवर शितपये, फळांना देखील मागणी वाढली आहे. तसेच नागरिकांनी बाहेर पडतांना रुमाल अथवा टोपीचा वापर करणे गरजेचे झाले आहे.