नंदुरबार l प्रतिनिधी
कजाकिस्थान येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटू सिद्धेश पांडे याने दुहेरी गटात कास्य पदक पटकावले आहे. भारताचे नाव उज्वल करणारा सिद्धेश पांडे हा मूळ नंदुरबारचा विद्यार्थी असून त्याने मिळवलेल्या या भरघोस यशामुळे नंदुरबार वासियांमधून अतिशय आनंद व्यक्त होत आहे.
नंदुरबार येथील रेल्वे विभागातील निवृत्त अधिकारी स्व.श्रीकृष्ण सोनगडकर यांचा हा नातू आहे. नंदुरबारच्या लक्ष्मी नगर कॉलनीत 25 वर्षांपासून त्यांचा रहिवास होता. त्यांची मुलगी सौ हर्षदा व मुकुंदराव पांडे (हल्ली राहणार मुबई) यांचा सिध्देश पांडे हा मुलगा आहे. त्याने कजाकिस्थान येथे टेबल टेनिस स्पर्धेत कांस्य पदक मिळवून भारताचे नाव उज्वल केल्याबद्दल नंदुरबार वासियांना अभिमान वाटत असून त्यांना परिचित असलेले येथील नागरिक आनंद साजरा करीत आहेत. नंदुरबार हे सिद्धेश चे जन्मस्थान. बालपणी सिद्धेश ची शाळेची सुट्टी त्याच्या आजोळी नंदुरबारलाच मजेत जायची. आजही त्याच्या वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं व्यस्त वेळापत्रक सांभाळून अजूनही नंदुरबार येथे त्याचा अधून मधून रहिवास असतो. वयाच्या सहाव्या वर्षापासून आज पर्यंत अविरतपणे त्याने त्याच्या टेबल टेनिस खेळासाठी परिश्रम घेतले आहेत. याआधीही त्याने अनेक आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांमध्ये जर्मनी, स्पेन, थायलंड हंगेरी ह्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या जागतिक मानाच्या स्पर्धेमध्ये हि त्याने सांघिक कांस्यपदक याआधी मिळवले आहे 18 वर्षे खालील वयोगटात स्पर्धेमध्ये त्याने अंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची कमाई यापूर्वी केली आहे शाळेत असल्यापासूनच त्याला त्याच्या खेळ कौशल्यासाठी सरकारची खेल शिष्यवृत्ती दरवर्षी मिळत आली आहे त्याची टेबल टेनिस खेळामधली कामगिरी, प्रगती आणि निपुणता बघून मागच्याच वर्षी त्याला केंद्र सरकारच्या सी जीएसटी कस्टम्स विभागात ( पुणे)* येथे नोकरीही मिळाली आहे. त्याची दैदिप्यमान प्रगती होत राहो आणि भारत देशाचे नाव उज्वल करण्याची कामगिरी सिद्धेश कडून नेहमी होत राहू यासाठी साऱ्या नंदवासीयांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.