नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील रोषमाळ बु. चा लहान खर्डीपाडा येथे परस्पर प्लॉट विक्री केल्याची विचारणा केल्याच्या रागातून आई-वडीलांनी मुलाला काठीने बेदम मारहाण करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील रोषमाळचा लहान खर्डीपाडा येथील संजय तुकाराम पावरा यांना वडील तुकाराम खाज्या पावरा व आई गमलीबाई तुकाराम पावरा हे त्यांच्या बालकीचा प्लॉट देणार होते. मात्र सदर प्लॉट तुकाराम पावरा व गमलीबाई पावरा यांनी परस्पर विक्री केला. याबाबत संजय पावरा यांनी विचारणा केली असता त्याचा राग आल्याने संजय पावरा यांना तुकाराम पावरा याने काठीने हातावर व दोन्ही पायावर मारहाण करुन गंभीर दुखापत केली.
तसेच गमलीबाई पावरा हिे हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत संजय पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.शशिकांत वसईकर करीत आहेत.








