नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील सप्तशृंगी मंदिराच्या समोर
पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याच्या बॅगेतील एक लाखाचे सोने दोघांनी लांबवल्याची घटना दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
शहादा येथील व्यापारी सुरेशचंद्र सोनराज जैन (६४ ) यांचे वर्दळीच्या सप्तशृंगी माता मंदिरा रस्ता लगत गोडाऊन आहे. या गोडाऊनकडे ते काल सायंकाळी जात असताना प्रकाशा रस्त्याकडून दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवत आम्ही पोलिस कर्मचारी आहोत, बॅगेमध्ये चरस घेऊन कोणीतरी फिरत असल्याची बातमी मिळालेली आहे. तुमच्या बॅगेत काय आहे? तुमच्या बॅगेची तपासणी करायची आहे, असे सांगितले. जैन यांनी ऑफिसचे कागदपत्रे असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या अंगावरील दागिणे पाहून तुम्ही दागिने का घातलेत? एवढे दागिने का आहेत? असे विचारून दागिने त्वरित बॅगेत ठेवून घ्या असे धमकावले.
त्यांनी लगेच बॅगेत हातातील अंगठ्या व ब्रेसलेट साखळी असा सुमारे अडीच तोळ्याच्या एक लाखाचा ऐवज ठेवला. त्यानंतर दोघांनी तुमच्या कार्यालयाची तपासणी करायची आहे, अशी बतावणी केली. जैन घाबरून बॅग सोडून लगेच कार्यालय उघडण्यासाठी गेले असता, दोघांनी त्यांचे दागिणे लांबवून पळ काढला सोने चोरीस गेल्याचे लक्षात आले.
याबाबत सुरेशचंद्र सोनराज जैन रा.श्रीराम कॉलनी, शहादा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२०,१७०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई माया राजपुत करीत आहे.








