नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाड्या,वस्ती व पाड्यांतील प्रत्येक कुटूंबाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, मोरंबा येथील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खा. डॉ.हिना गावित,आमदार आमश्या पाडवी, जि.प.सदस्य सुरैय्या मक्राणी, आरिफ मक्राणी, किरसिंग वसावे, सरपंच उषा बोरा (अक्कलकुवा), अशोक पाडवी (वाण्याविहीर ), किसन नाईक (अलिविहीर ),तहसिलदार रामजी राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता चैतन्य निकुंभ यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक नागरिकांला शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी केंद्र शासनाने भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करुन पुढील 30 वर्षांचे नियेाजन करुन जलजीवन मिशन ही योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के व राज्य शासनाकडून 30 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बहुतांश आजार हे दुषित पाण्यामुळे होत असल्यामुळे या योजनेमुळे प्रत्येक कुटूंबाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने अनेक दुषित पाण्याच्या माध्यमातून आजारापासून मुक्ती मिळणार आहे.
55 लिटर दरडोई पाणी मिळणार असल्याने पाण्याचा वापर अधिक होईल व त्यातून सांडपाणीचा निचरा होण्याच्या दृष्टीने भूमिगत गटाराची व्यवस्था तसेच नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी येत्या दोन वर्षांत प्रत्येक वाडा, वस्ती व पाड्यांत जाण्यासाठी बारमाही रस्ते तयार करण्यात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या आठवड्यात सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांची बैठकीत ज्या गावांची लोकसंख्या 5 हजार पेक्षा अधिक आहे अशा गावांत भूमिगत गटारी बांधण्यासाठी तसेच गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातुन ग्रामीण, तालुका व जिल्हास्तरावर सांस्कृतिक भवन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकुवा शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या गरीब व्यक्तींना घरे नाही अशांना आदिवासी विकास विभागामार्फत मोठया प्रमाणात घरकुलाचे काम घेण्यात येत असून ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव सर्व आदिवासी बांधवांना 100 टक्के घरे देण्यात येईल. तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी तापी व देहली प्रकल्पातुन पाणी आणुन याभागातील सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल. तसेच देहली प्रकल्पा खालील क्षेत्रात लहान बंधारे बांधण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.