नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील पाडामुंड पाटीलपाडा दारुच्या नशेत शिवीगाळ का करतो असे विचारल्याच्या रागातून घराला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील पाडामुंड पाटीलपाडा येथील भगतसिंग नाग्या तडवी हा भिका कागडा तडवी यांची पत्नी व मुलास दारुच्या नशेत शिवीगाळ करीत होता. यावेळी भिका कागडा तडवी यांनी भगतसिंग तडवी यास शिवीगाळ का करतो असे विचारले. याचा राग आल्याने भगतसिंग तडवी याने भिका तडवी त्यांची पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच भिका तडवी यांच्या घराला आग लावून घराच्या छताचे कौल, कौल ठेवण्यासाठीच्या सागाच्या दांड्या, बल्ल्या, धऱ्या मोरबगटी ११ क्विंटल मोहर, ८ क्विंटल ४ नगर धान्य ठेवण्यासाठी बनविलेल्या बांबूच्या दांडीच्या कोठ्या व सतर घरातील साहित्य जळून सुमारे १० ते १२ हजाराचे नुकसान झाले. याबाबत भिका तडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात भगतसिंग तडवी याच्याविरोधात भादंवि कलम ४३६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण महाले करीत आहेत.