नंदूरबार l प्रतिनिधी
सातपुड्यात आजही शेकडो आदिवासी महिला डाकीण प्रथेला बळी पडत आहेत.या आघोरी प्रथेमुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले असून डाकीण महिलांना जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून प्रशासनाने न्याय मिळवून देण्यासाठी खंबीर भूमिका घ्यावी, असे मत अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथिल डाकीण प्रथा पिडीत असणाऱ्या सेवीबाई वसावे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या संयुक्त वार्षिक प्रेरणा मेळाव्याचे उद्घाटन सेवीवाई वसावे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी त्या बोलत होत्या. डाकीण पिडीत महिलांचा होणारा छळ,अपमान,अत्याचार,बहिष्कार,इत्यादी शोषणाची कवाडे प्रबोधनाच्या चावीने उघडून सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त करण्याचे दालने उघडे करणे,या संदेश देणाऱ्या प्रतीकात्मक कृतीतून या प्रेरणा मेळाव्याचे उद्घाटन सेमीबाई वसावे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र अंनिसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष हैदर अली नुराणी,माजी जिल्हा अध्यक्ष डॉ शशांक कुलकर्णी, महाराष्ट्र अंनिसचे सचिव राज्य प्रधान सचिव ठकसेन गोराणे (नाशिक),राज्य कार्यवाह प्रा परेश शहा (शिंदखेडा), ॲड.गोविंद पाटील,सुरेश बोरसे,सुरेश बिऱ्हाडे, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी बी शेंडे,धुळे जिल्हा उपाध्यक्ष डॉ शरद वाणी,नवल ठाकरे,उद्घाटक सेवीबाई वसावे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डाकीण पिडीत असणाऱ्या सेवीवाई वसावे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती.अनिसचे कार्यकर्ते शितल वसावे, वसंत वळवी,हंसराज महाले,रायसिंग पाडवी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत सेवीबाई यांनी त्यांना डाकीण ठरवण्यात आलेल्या घटनेपासून तर तिच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यापर्यंतची आपबिती कथन केली.यात त्यांना व त्यांच्या कुटुंबाला झालेला व सध्याही होत असलेला शारीरिक, मानसिक त्रास,गाव पाड्या सोडण्यात बाध्य करायला लावण्यापासून ते पोलीस ठाण्यात दाद न मिळणे,राजकीय सामाजिक दबाव व हस्तक्षेप महाराष्ट्र अंनिसचे सहकार्य, जिल्हा प्रशासनाकडे केलेली तक्रार व कार्यवाहीतून मिळालेल्या काही अंशी न्याय पर्यंतचा सर्व घटनाक्रम व प्रवास उलगडून सांगितला.
हे सांगत असताना त्यांच्या भावना अनावर होऊन डोळ्यात अश्रू आले.अजूनही सातपुड्याच्या अनेक गाव पाड्यात डाकीण ठरवलेल्या महिला असून त्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने खंबीर भूमिका घ्यावी व ठोस कृती कार्यक्रम राबवावा.मी स्वतः पुढाकार घेऊन डाकीण पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती व प्रशासनाच्या कामात पुढे राहील,असे हे समारोपप्रसंगी म्हणाल्या.
दरम्यान,त्यानंतरच्या सत्रात राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाची व्यापक वैचारिक भूमिका या विषयावर तर हंसराज महाले यांनी जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर या मेळाव्यात मार्गदर्शन केले. मेळाव्याला धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनिसचे शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत.
सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले तर आभार बलदेव वसईकर यांनी मानले.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शहादा शाखेची संतोष महाजन, प्रदीप केदारे,प्रवीण महिरे,सुवर्णा जगताप,आरिफ मण्यार, विजय बोडरे,सुभाष भुजबळ,हृदयेश चव्हाण,प्रवीण वाणी,आबा आगळे,प्रवीण वाघ,आदी परिश्रम घेतले.








