नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने राज्यात हरभरा खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणी साठी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी विधानभवनाच्या पायरी वर आंदोलन केले.
राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य व हमी भाव मिळत नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. महागाई, अवकाळी पाऊस,आदी विविध संकटावर मात करत शेतकरी राजा अन्न धान्य पिकवीत आहे मात्र सत्ताधाऱ्यांचं राज्यातील शेतकऱ्यांकडे पुर्णतः दुर्लक्ष झाले आहे.हरभरा पिकाची शासकीय खरेदी होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
त्यामुळे शासनाने तात्काळ हरभऱ्याची खरेदी करावी या मागणीसाठी आमदार आमश्या पाडवी यांनी विधान भवनाच्या पायरीवर बसुन आंदोलन केले यावेळी विधान भवनात जात असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक आमदारां सोबत चर्चा केली व संबंधित विभागास तात्काळ निर्देश दिले जातील असे आश्वासन दिले.याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या समवेत मंत्री शंभुराजे देसाई होते
यावेळी आ. राहुल पाटील, आ. कैलास पाटील,आमदार किशोर दराडे आदी उपस्थित होते.