नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा-वडगाव रस्त्यावरील डोंगरगावजवळ गांजाची वाहतूक करतांना आढळून आल्याप्रकरणी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून दुचाकीसह सुमारे दोन लाखाचा गांजा जप्पत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील वडगाव येथील रामदास टांग्या पावरा हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवर (क्र.एम.पी. पी ८४३०) शहादा-वडगाव रस्त्यावरील डोंगरगाव गावाजवळ विना परवाना बेकायदेशीरित्या सुका गांजाची वाहतूक करतांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख १३ हजार २३२ रुपये किंमतीचा ९ किलो ४३६ ग्रॅम वाजनाचा हिरवट सुका गांजा व ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ८३ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोना विकास हिंमत कापुरे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात रामदास पावरा याच्याविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे करीत आहेत.