नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनासह सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा शहरात किरण जालनसिंग तडवी (रा.सोरापाडा), शुभम परदेशी उर्फ बॉबी, विनोद भगवानदास बनिया, दीपक परदेशी (तिघे रा.अक्कलकुवा), राजू शेठ (रा.निझर), होला शेठ (दोघे रा.निझर) यांनी संगनमत करुन त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहनात (क्र.एच.एच.०२ वायए ४४२१) महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतांनाही सुंगधीत सुपारी व तंबाखू कब्जात बाळगून अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करतांना आढळून आले.
पोलिसांनी ७ लाख ८८ हजार ३२० रुपये किंमतीचे ३६०८ विमल पानमसाला, १ लाख ९३ हजार ४४० रुपये किंमतीचे ४४४० पाकीट तंबाखू व ४ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १३ लाख ८१ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बशिर तडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८, १०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.