बोरद l प्रतिनिधी
आदिवासी परंपरेत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेल्या भोंगऱ्या बाजार हा बोरद येथे दि. ५ मार्च रोजी आहे. होळीही दि. ६ मार्च रोजी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला असून एक दिवस अगोदर म्हणजे ५ मार्च रोजी भोंगऱ्या भरत असतो.
आदिवासी सण परंपरेमध्ये होळीला सर्वाधिक महत्त्व आहे. होळी पूजनासाठी आवश्यक साहित्याची खरेदीसाठी भोंगऱ्या
बाजार भरविण्यात येतो. डाळ्या, खोबरे, गुळ,खजूर, हारकंगन व लहान मुलांची खेळणीची दुकाने संसार उपयोगी वस्तू तसेच मेवा मिठाई ची दुकाने ही बाजारात मोठ्या प्रमाणात लावली जात असतात. वयानुसार युवक युवतींचा गरजा लक्षात घेऊन विविध वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची दुकाने ही मोठ्या प्रमाणात दिसून येतात बोरद गाव हे सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेले गाव असून १२ हजार लोकसंख्येचे गाव आहे बोरद गावाला लागून शेजारीच ३६ आदिवासी खेडे जोडलेले आहेत. या परिसरातील सर्व आदिवासी बंधू भोंगऱ्या बाजार करण्यासाठी बोरद येथे येत असतात.
बोरद गाव हे मध्यप्रदेश गुजरात व महाराष्ट्र या तिन्ही राज्याच्या सीमेवर वसलेले गाव आहे.होळी हा आदिवासी बंधूंचा मुख्य सण असतो. त्यामुळे आदिवासी समाजातील तरुण ज्या ठिकाणी रोजगारासाठी कामासाठी नोकरीसाठी धंद्यासाठी बाहेरगावी गेलेले असतात ते दोन दिवस होळी करण्यासाठी आपल्या गावी येत असतात तसेच मुली ही ज्या आपल्या सासरी गेलेल्या असतात त्या सुद्धा होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडे येत असतात.
तळोदा तालुक्यात फक्त बोरद येथेच भोंगर्या बाजार भरत असतो. या भोंगऱ्या बाजारात सर्व आदिवासी बंधू आपल्या समाजाचा पेहरावानुसार ढोल, ताशाच्या गजरात वाजत गाजत येत असतात त्या ठिकाणी आपले सर्व नातेवाईक बोरद येथे एकत्र येतात व भेटत असतात व आपली खुशाली विचारत असतात. मनोरंजनाच्या दृष्टीने भोंगर्या बाजारात सामूहिक नृत्याचा कार्यक्रम होत असतो. सायंकाळी होळी पूजनाचे साहित्य घेऊन आपापल्या गावी जात असतात व दुसऱ्या दिवशी आपल्या गावी होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतात.
भोंगऱ्या बाजार होळी सण हा आदिवासी बंधूंचा मुख्य सण असल्याने सर्व आदिवासी बंधू भोंगर्या बाजार करण्यासाठी बोरद येथे येत असतात त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने आठ दिवस अगोदर स्वच्छता मोहीम राबवत गावात लाईट ही बसविण्यात आले असून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत २४ तास आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे. २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विद्युत वितरण कंपनीला ग्रामपंचायत प्रशासनाने पत्र दिलेले आहे.
बोरद गावाला सध्या यात्रेचे स्वरूप आलेले आहे दोन दिवसात लाखोंची उलाढाल भोंगर्या बाजारात होत असते. ‘काळूमोडू करीने आवजो मारा बोरदना भोंगर्या बाजार मे’ या गाण्याचे सूर पान टपरी, दुकानदार याठिकाणी लावले असतात. त्या तालावर तरुण नाचत असतात. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता होळी पूजन करत गावातील मुखिया यांच्या हस्ते होळी पेटवली जात असते त्यावेळी ढोल ताशा च्या गजरावर तरुण रिंग होळीचा आजूबाजूला फिरून होळी मातेचे दर्शन घेत असतात. नंतर महिला वर्ग होळी मातेचे पूजन करून नैवेद्य दाखवीत असतात व दर्शन घेत असतात. होळीच्या शिवाय घरी कोणीही जेवण करीत नाही अशी प्रथा आहे.नंतर महिलावर्ग होळी मातेचे पूजन करून नैवेद्य दाखवीत असतात व दर्शन घेत असतात होळी पेटवल्या शिवाय घरी कोणीही जेवण करीत नाही अशी प्रथा आहे.








