नंदुरबार | प्रतिनिधी
तालुक्यातील समशेरपुर येथील आयान साखर कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. साखर उतारा १०.४० टक्के असून दहा लाख 24 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. मराठवाडा खानदेश आणि विदर्भात सर्वाधिक गाळप करणारा हा कारखाना ठरला आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक एस. एस. सीनगारे यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर टापरे, मुख्य शेतकी अधिकारी ए.आर. पाटील उपस्थित होते.
कारखान्याच्या गाळप बाबत माहिती देताना श्री. सिनगारे म्हणाले, कारखान्याची धुरा गेल्या बारा वर्षापासून श्री. टापरे हे सांभाळत आहेत. युनिटच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी बारकाईने लक्ष घातले शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी यासह कारखान्याची संलग्न सर्व घटकांची त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. यातून कारखाना अधिकाधिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमा भागात हा कारखाना आहे. कारखान्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून कमीत कमी दिवसात अधिकाधिक ऊस गाळप आणि त्यातही साखर उतारा चांगला देण्याचा उच्चांक गाठला आहे.
कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता २३५० रुपये नियमित अदा केला आहे. शेतकरी आणि ऊस तोडणी मजुरांना 231 कोटी रुपयांची पेमेंट अदा करण्यात आले आहे. साखर आयुक्तांच्या औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांच्या यादीमध्ये उसाचा दर वेळेत पेमेंट यामध्ये कारखाना सातत्याने वरच्या क्रमांकावर आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा हा कारखाना ठरला आहे. तसेच कामगार आणि मजुरांना रोजगार उपलब्ध करण्यातही मोठा हिस्सा आहे.
कारखान्यातर्फे कामगार मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा चालवली जाते. त्यात 325 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच कामगारांचे हितही जोपासले जाते. कारखान्यात आधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. दररोज नऊ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला जातो. उसाचे वजन घटल्यामुळे क्षमते आणि अपेक्षेप्रमाणे ऊस गाळप होत नाही. त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी कालावधीमध्ये नोंदलेला बिगर नोंदलेला सर्वच उसाचे गाळप करण्यात येणार आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्र वाढवावे, असे आवाहन यावेळी श्री. सिनगारे यांनी केले.
कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्र वाढवणे आवश्यक आहे सर्वाधिक ऊस गाळप करणारा हा कारखाना ठरला आहे यात शेतकरी कामगार मजूर व सर्व संबंधितांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
पद्माकर टापरे,
मुख्य कार्यकारी अधिकारी आयान साखर कारखाना








