नंदुरबार | प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले असता पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या समारंभ कवायतीचे निरीक्षण केले. त्यानंतर मॉब डिस्पर्सल ड्रील व पोलीस दलाच्या मैदानी प्रात्याक्षीकांसह विविध कवायत प्रकारांचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले.
मागील महिन्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीप्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका, विसरवाडी, शहादा व तळोदा या पोलीस ठाण्यांची तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, नंदुरबार व शहादा यांची वार्षिक तपासणी केली होती. त्यादरम्यान त्यांनी विसरवाडी, नंदुरबार तालुका व तळोदा पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वाचनालयांचे तर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात महिला अधिकारी व अंमलदार यांच्यासाठीच्या महिला विश्राम कक्षाचे तसेच शहादा पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस व्यायाम शाळेचे उद्घाटन करुन जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचे कौतुक केले होते.

याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोलीस सब्सीडिअरी कॅन्टींग, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, डायल-११२, वाचक शाखा, लेखा शाखा, आस्थापना शाखा, अर्ज शाखा, पेन्शन शाखा, पत्रव्यवहार शाखा यांच्या कामकाजाचा आढावा देखील डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी घेतला. पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकारी यांच्या वैयक्तिक मुलाखती देखील त्यांनी घेतल्या. अधिकार्यांच्या मुलाखती दरम्यान अधिकार्यांनी मागील वर्षभराच्या काळात केलेल्या वैयक्तिक कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच अधिकार्यांच्या प्रशासकीय तसेच वैयक्तिक अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार करीत असलेल्या कामकाजाबाबत डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, शहादा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.








