चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर
तळोदा बस स्थानकात तहानेने व्याकूळ प्रवाशांची तहान भागविणे बाबत तळोदा शहर सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे तळोदा आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा बस स्थानक म्हणजे तळोदा शहर व तालुक्यातील १२३ खेड्यांना जोडणारी नाळ आहे. या बस स्थानकाच्या परिसरात दररोजचे हजारो विद्यार्थी व नागरिक यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे सदर बस स्थानकाच्या परिसरात पाण्याची व्यवस्था करणे ही मूलभूत गरज ठरते. ही गरज ओळखून काही दानशूर व्यक्तींनी तेथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीची व्यवस्था करून दिली होती. परंतु सदर टाकीकडे व तिच्या देखभालीकडे बस स्थानक व्यवस्थापनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
तरी सदर पाण्याच्या टाकीत आधुनिक पद्धतीचा वापर करून पिण्यायोग्य शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून तहानेने व्याकुळ झालेल्या नागरिकांचे, प्रवाशांचे हाल होणार नाही या संदर्भात आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी राकेश भोई, मयुर ढोले, राहुल शिवदे, प्रमोद मोरे, गिरीश भोई, नीरज रामोळे, जयेश कुंभार, गोलू जावरे, योगेश जोहरी, प्रशांत मोरे, मयुर वानखेडे, दिनेश पावरा, सचिन भोई आदी उपस्थित होते.