नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाल्याचे प्रकरण ताजे असताना शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशासाठी शासकीय ठेकेदाराकडून साडेतीन लाख रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी शहादा येथील एका शासकीय ठेकेदाराकडून रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशासाठी पैशांची मागणी केली. शासकीय ठेकेदारांनी याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार काल दि.२ मार्च रोजी सापळा रचण्यात आला होता.
ठरल्याप्रमाणे एकूण रकमेपैकी काल सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड शासकीय निवासस्थान येथे स्विकारत असतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंच साक्षीदारांसमक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना रंगेहात पकडले. सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड पथकाने हस्तगत केली असल्याचे समजले आहे. रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ तसेच पोहेकॉ.विजय ठाकरे, अमोल मराठे, पोना.देवराम गावित आदींच्या पथकाने केली आहे.नंदूरबार येथे मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाल्याचे प्रकरण ताजे असताना हे प्रकरण घडले.दोन महिन्यात पाच कारवाया करण्यात आल्या आहेत.