नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील वर्धमान नगरात चोरट्यांनी घरफोडी करीत रोकडसह दागिने असे सुमारे ८० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील वर्धमान नगरात रोहिदास सोनार यांचे घर आहे. सदर घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरात असलेली २५ हजार रुपयांची रोकड, ३५ हजार रुपये किंमतीच्या १० ग्रॅमच्या ४ अंगठ्या, १७ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ ग्रॅम दोन सोन्याचे झुमके असा एकूण ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
याबाबत चंद्रकांत वामन सोनार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.