नंदुरबार l प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ. श्री. बी.जी.शेखर पाटील हे 6 ते 9 जानेवारी दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. दरम्यान विसरवाडी पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी विसरवाडी पोलीस ठाणे येथे आले असता तेथील पोलीस अधिकारी, अमंलदार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी वाचनालयाचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात व्यायाम शाळा, वाचनालय, पोलीस क्लब, पोलीसांचे ज्ञान वृध्दींगत होण्यासाठी व विरंगुळा करण्यासाठी वाचनालय उपलब्ध असावेत जेणेकरुन पोलीस अधिकारी व अमलदारांना फावल्या वेळेचा चांगल्याप्रकारे उपयोग करुन घेता येईल हा यामागील उद्देश आहे. त्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अमंलदार व त्यांच्या पाल्यांना पोलीस ठाणे आवारातच पोलीस वाचनालय निर्माण करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी कामाच्या व्यापातून वेळ काढून नियमीतपणे वाचन करावे. पोलीस ठाणे आवारात वाचनालय असल्यास वाचनालयाचा फायदा पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या सोबत पोलीस पाल्यांना देखील होवू शकतो. बरेचसे पोलीस अधिकारी व अमंलदारांचे पाल्य विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यासाठी देखील त्यांना वाचनालयाचा उपयोग चांगल्या प्रकारे होवू शकतो असे वाचनालय उद्घाटन प्रसंगी त्यांनी सांगितले.
विसरवाडी पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी. अमलदार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी वाचनालयाचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर वाचनालयात विविध महापुरुषांच्या जीवनावर आधारीत असलेले ग्रंथ, कथा, कादंबऱ्या व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पोलीस पाल्यांसाठी UPSC व MPSC अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच सदर वाचनालयात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी लिहीलेली पुस्तके देखील उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. पोलीस ठाणे आवारातच आधुनिक वाचनालय सुरु केल्याने विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमलदारासोबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर विसरवाडी पोलीस ठाणे येथील परिसरात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते विसरवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पटांगनात क्रिकेट पिचचे देखील उद्घाटन करण्यात आले. सततच्या या कामाच्या व्यापातून बाहेर पडून पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांना आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ हे एक महत्वाचे साधन आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
विसरवाडी पोलीस ठाणे परिसराची पाहणी करुन तेथील पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून पोलीस ठाण्याचा गुन्हे आढावा घेतला. तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवून ते करीत असलेल्या कामाकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.








