खेतिया । वार्ताहर
येथील पानसेमल रोडवरील संचेती कॉटेक्स जिनींगमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री 12.30 ते 1.30 च्या दरम्यान प्रवेश करून जिनींगच्या ऑफिसमधील तिजोरी खोलीमधून ढकलत आणून जवळच असलेल्या इन्होवा कारमध्ये तिजोरी टाकून चोरटे पसार झाले. या तिजोरीमध्ये 12 लाखाच्या वर रोकड होती. श्रीखेड ते कुरंगी रस्त्यावर सदर रोकड लंपास करुन वाहन व तिजोरी रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
येथील संचेती कॉटेक्समध्ये काल अज्ञात चोरट्यानी मध्यरात्री 12.30 ते 1.30 च्या सुमारास जिनींगमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकास हत्याराचा धाक दाखवून ऑफिसमध्ये शिरून 3 क्विंटल वजनाची तिजोरी ताब्यात घेतली. या तिजोरीमध्ये 12 लाख रूपयांची रोकड होती. चोरट्यानीं तिजोरीला ढकलत आणून ओट्यावर ठेवली. जवळच उभ्या असलेल्या इन्होवा कार (क्र.एमपी09 सीएन 9957) ही कार ढकलत आणून ओट्याजवळ उभी केली. ऑफिसमध्ये असलेल्या कीबोर्ड जवळ गाडीची चावी काढून गाडीला लाउन गाडीच्या मागचा दरवाजा उघडुन त्यात तिजोरी ठेवली. व चोरटे पसार झाले.
संबंधित सुरक्षा रक्षकाने ताबडतोब घटनेची माहिती संचेती कॉटेक्सचे मालक दिलीपकुमार पाबुदान संचेती यांना दिली. त्यांनी घटनेची माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलीस निरीक्षक छगनसिंह बघेल व त्यांचे सहकारी फौजफाट्यासह जिनींग परिसरात पोहोचले. तोपर्यंत अज्ञात चोरटे पसार झाले होते. यावेळी तात्काळ नाकाबंदी करून सर्चिंग ऑपरेशन सुरू केले. यावेळी जिनींग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची पाहणी केली असता चोरट्यांचे सर्व कारनामे रेकार्ड झाले असून त्यात एकुण 5 चोरटे दिसून आले.
गाडी कोणत्या दिशेला गेली ते पाहुन पोलिस यंत्रणा कामाला लागली. खेतियापासून 3 कि.मी.च्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील श्रीखेड ता. शहादा या गावाजवळ श्रीखेड ते कुरंगी रस्त्यावर 300 मीटरच्या अंतरावर शेतामध्ये बेवारस तिजोरी व थोड्या अंतरावर इन्होवा गाडी नागरिकांना उभी दिसली. गावातील पोलिस पाटील राजेश दिवाण पटले यांनी खेतिया व म्हसावद पोलिसांना माहिती दिली.
त्यावेळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक छगनसिंह बघेल व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बडवानी जिल्हयाचे पोलिस अधिक्षक दीपककुमार शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रोहितसिंह अलावा व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी बडवानी येथील श्वान पथक व ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने चोरट्यांचा श्रीखेड ते कुरंगी रस्त्यावरील नाल्यापर्यंत माग काढला. ठसेतज्ञांनी तिजोरीवरील फिंगरप्रिंट घेउन पाहणी केली. यावेळी म्हसावद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, ए.एस.आय. प्रदिपसिंह राजपूत, हेड काँस्टेबल घनश्याम सुर्यवंशी, पोलिस काँस्टेबल कलिम रावताळे, यांनी पाहणी केली.
या घटनेमुळे खेतिया कापूस व्यवसाय आणि जिनींग व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. संचेती कॉटेक्सचे मालक दिलीप संचेती यांनी सांगितले की दररोज कपाशीच्या खरेदीसाठी पैशांची देवाणघेवाण सुरू असते. त्यामुळे तिजोरीमध्ये 12 लाखाच्यावर रोकड होती. परंतु अज्ञात चोरट्यानी तिजोरीसह रोखरक्कम लंपास केली आहे.








