धडगाव l प्रतिनिधी
धडगाव- शहादा दरम्यान अवैध दारु वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धडगाव पोलिसांनी सापळा रचून 9 लाखाच्या अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघां विरूद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.एकास अटक केली असून एक जण फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धडगावचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना गुप्त माहिती मिळाली की, मध्यरात्री शहादाकडून धडगावकडे अवैध दारुने भरलेला ट्रक येत आहे श्री. औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव पोलिसांनी चोंदवाडे ता. धडगाव फाट्यावर रात्री 3.45 वाजता सापळा रचून ट्रक ( क्र.जी.जे. 16,डब्ल्यू , 8554 )हे वाहन अडवले. दरम्यान ट्रक चालकाला विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यात विना परवाना वाहतूक होणारी सुपर व्हिस्की या दारूचे तब्बल 100 बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये प्रत्येकी 12 बाटल्या अशा एकूण 120 बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या असून त्याची 9 लाख एवढी किंमत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या 9 लाखाच्या दारुसह 13 लाखाचा ट्रक असा एकूण 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र चोरले यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक मालसिंग उतऱ्या पाडवी रा. जुनीकरी पाडा (काकडदा) ता. धडगाव व मंगल हिम्मतसिंग पावरा रा.उमराणी बी. या दोन जणांविरुद्ध धडगाव पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई), 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालसिंग उतऱ्या पाडवी यास पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनानुसार संजय मनोरे, राजेंद्र जाधव, विनोद पाटील, महेश कोळी, गणेश मराठे, हिरालाल सोनवणे व अभिमन्यू गावीत यांच्या पथकाने केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे हे करत आहे.