शहादा l प्रतिनिधी
दिव्यांगांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने राज्यस्तरीय अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट प्रयत्नशील आहे.चेतना मेलडी आर्केस्ट्राच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत निधी गोळा करून दिव्यांगांना आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे.शहादा शहरातील विविध दानशूरांच्या सहकार्यातून येत्या दि. 4 फेब्रुवारी रोजी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजन समिती कडून देण्यात आली आहे.
अंध अपंग प्रगती सोसायटीच्या मार्फत याविषयी माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ट्रस्टचे तात्या पानपाटील,संतोष पाटील, निर्मला शिरसाठ, प्रदीप कामे, पद्मसिंग गिरासे उपस्थित होते.
श्री.पानपाटील माहिती देतांना म्हणाले,अपंगांना समाजाची सहानुभूती नको मात्र सहकार्याची गरज आहे.अंध अपंगांना घरकुल, अंत्योदय योजना, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील आहे.
अंध मुला मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी निधी उभा करणे गरजेचे आहे. दिव्यांगांच्या कुटुंबीयांच्या मदतीसह आर्थिक विकासासाठी समाजातील दानशूरांच्या सहकार्यातून प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील पंधरा अंध कलाकारांच्या चेतना मेलडी आर्केस्ट्राद्वारे राज्यातील विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहादा शहरवासीयांच्या व परिसरातील शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी, वकील संघाच्या सहकार्याने दि.4 फेब्रुवारी रोजी रात्री सात ते दहा वाजेपावेतो अन्नपूर्णा लॉन्स, पटेल रेसिडेन्सी समोर, डोंगरगाव रोड, शहादा येथे चेतना मेलडी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.दिव्यांगांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने जनजागृती व्हावी. आमच्यातील सुप्त कला, गुण, कौशल्य समाजापावतो पोहोचावेत. या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.








