म्हसावद l प्रतिनिधी
मॉरिशस येथे डॉ.जसपालसिंग वळवी यांना “भाषा सहोदरी सम्मान” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विश्व हिंदी दिनानिमित्ताने मॉरिशस येथे ९ वा आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला. भाषा सहोदरी – हिंदी न्यास, दिल्ली व मॉरिशस येथिल महात्मा गांधी संस्थान यांच्या सयुक्त विद्यमाने विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मॉरिशसचे राष्ट्रपती महामहीम पृथ्वीराजसिंह रूपन, महात्मा गांधी संस्थानचे अध्यक्ष प्रेमलाल महादेव , महानिदेशक राजकुमार रामप्रताप, भाषा सहोदरी हिंदी न्यासचे अध्यक्ष जयकांत मिश्रा ,मिना चौधरी, तसेच भारतातील २४ राज्यामधून आलेले हिंदी साहीत्यकार या हिंदी सम्मेलनात उपस्थित होते. यावेळी डॉ.जसपालसिंग वळवी यांनी ” विश्व मंच पर हिंदी” या विषयावर आलेख सादर केला होता. डॉ. वळवी हे अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटिश अंकुशविहीर येथील अश्वत्थामा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत डॉ.जसपालसिंग वळवी यांची मॉरिशस येथे होणाऱ्या हिंदी भाषा आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी निवड झाली होती.
आंतरराष्ट्रीय हिंदी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी हे अधिवेशन घेतले जाते; भारतातून दरवर्षी १०० प्रतिनिधींची निवड केली जाते.त्यासाठी वाण्याविहीर येथिल रहीवासी व अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रि.अंकुशविहीरचे मुख्याध्यापक डॉ.जसपालसिंग वळवी यांची खान्देशातून व नंदूरबार जिल्ह्यातून एकमेव निवड झाली होती.या आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा विषयाच्या अधिवेशनात हिंदी भाषा विषयी चर्चा,परिसंवाद,कवि संमेलन,पुस्तक प्रकाशन , याशिवाय तेथिल दूतावास आणि तज्ञांच्या भेटी, ऐतिहासिक स्मारकांच्या भेटी इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ.जसपालसिंग वळवी यांना भाषा सहोदरी हिंदी न्यास दिल्ली यांचाकडून देण्यात येणारा “भाषा सहोदरी सम्मान” पुरस्कार अध्यक्ष जयकांत मिश्रा, सचिव मिना चौधरी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व सन्मानपत्र,शाल प्रदान करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल विद्या विकास संस्था वाण्याविहीर चे अध्यक्ष नागेश पाडवी ,सचिव प्रभाकर उगले , अक्कलकुवा पं.स चे गटशिक्षणाधिकारी मंगेश निकुंभ , अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय व सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व सहकारी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.