नंदुरबार | प्रतिनिधी
कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभिसभेवर (सिनेट) नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी काल जिल्ह्यातील पाच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळपर्यंत सरासरी ५१ टक्के मतदान झाले होते.
कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी २७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील २ हजार ८१४ मतदारांसाठी पाच मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये नंदुरबारमध्ये १९९१, शहादा ३७९,अक्कलकुवा १०६,नवापूर १३९ व तळोदा येथील मतदान केंद्रांवर १९९ मतदारांसाठी पाच मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
काल सायंकाळपर्यंत सरासरी ५१ टक्के मतदान झाले. यामध्ये नंदुरबार येथील जी.टी.पाटील महाविद्यालयातील मतदान केंद्रावर ४६ टक्के, नवापूर येथील श्री सु.व्ही.नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर ४५ टक्के, पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील मतदान केंद्रावर ५४ टक्के तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा येथील मतदान केंद्रावर ६३ टक्के व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा येथील मतदान केंद्रावर ४७ टक्के मतदान झाल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वित्त व लेखाधिकारी रविंद्र पाटील यांनी भेटी देवून पाहणी केली. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दि.१ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे. यामुळे आता पदवीधर मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात हे मतमोजणीनंतर समजणार आहे.








