शहादा l प्रतिनिधी
आम्हाला आमचेच निळ्या जाणव्यात दिसतात…..
तेव्हा आम्हीच स्वतःला शूद्र म्हणावं की काय?…..
जोपर्यंत या देशात फुले-शाहू-आंबेडकरांचे विचारांची सुत्रे रूजत नाही. तोपर्यंत समतेच्या वाटेवर देश एकत्र होणार नाही अशी खंत महाराष्ट्रातील प्रसिद्ध विद्रोही कवि दंगलकार नितिन चंदनशिवे यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली. महापुरूषांना आपल्या जातीचा असे संबोधले तर त्यांच्यावर अजामिनपात्र गुन्हे दाखल केले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले.
शहादा येथील फुले-आंबेडकर स्टडी सर्कलच्यावतीने 74 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त समतेच्या वाटेवर हा काव्य गायन समारंभ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आला होता.सुप्रसिद्ध विद्रोही कवि नितिन चंदमशिवे यांनी रात्री पावणे दहा वाजेपर्यंत समता, बंधुता, लोकशाही, संविधान आणि सामाजिक बांधिलकी या विषयावर कविता सादर केल्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जनार्थ संस्थेच्या संचालक रंजना कान्हरे, डाॅ.आत्माराम इंदवे, , फुले शाहू आंबेडकर स्टडी सर्कलचे संस्थापक अध्यक्ष अनिल कुवर.अध्यक्ष चुनिलाल ब्राम्हणे, आदिवासी पावरा समितीचे नामदेव पटले, प्रा.राजेंद्र निकुंभे, नरेंद्र कुवर,सुरेंद्र कुवर, प्रा.नेत्रदीपक कुवर,प्रा . डॉ.मनोज गायकवाड, सुनिल शिरसाठ,रवी मोरे, प्रदीप केदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कवि नितिन चंदनशिवे आपल्या विद्रोही भाषेत कविता सादर करतांना म्हणाले की, माझे शब्द आणि कविता इतकेही स्वस्त नाही की मी कोणत्याही विषयावर लिहावं मात्र या देशातील लोकशाहीवर,विविधतेने नटलेल्या परंपरेवर,या देशाच्या संविधानावर आणि इथल्या मानवतेवर प्रेम करणाऱ्या भारतीयांना मी इतकंच सांगेन की, अजिबात चिंतीत होऊ नका.या काजव्यांचा हंगाम जास्त काळ टिकत नाही.सूर्य दररोज उगवत असतो आणि उजाडलेल्या भारतातला उजेड आज धोक्यात असला तरीही उजेडाला कुणीही अडवून ठेवू शकणार नाही.अंधाराचा मुक्काम जास्त काळ राहणार नाही.विज्ञान कधीच मरणारे नाही.इथला भारतीय कधीच संपणार नाही कारण एकच येथे ‘आंबेडकर’ अजूनही जिवंत आहे आणि उद्याही असणार आहे.
कवी नितिन चंदनशिवे रसिकांना मंत्रमुग्ध करत भारतीय संविधानावर कविता सादर करून अंगावर काटे आणले.त्यांनी सादर केलेल्या *संविधान*कवितेत त्यांनी धर्मग्रंथ व संविधान यावर सुस्पष्ट भाष्य केले. दंगलकार कवी नितीन चंदनशिवे आपल्या पुढच्या कवितेतून म्हणाले ,अल्ला ने मंदीर पाडल्याचा आणि रामाने मशीद तोडल्याचा इतिहास अजून तरी वाचनात आला नाही असे सांगून तसा धर्म कुणाला कळलाच नाही.संविधान लिहिणारा धर्मावर नाही तर माणसावर प्रेम करणारा होता.आणि त्याला विश्वास होता केव्हा ना केव्हा इथंली मेंढरं माणसं होऊन माणसात येतील.
कवी चंदनशिवे यांनी आपल्या गावच्या जत्रेतील गाढव पन्नलालची कथा, आंबेडकरी चळवळसाठी झटणारा रिक्षा चालक विलास वाघमारे व कवितेतुन संसाराचे गाडे पुढे चालणार व पोटही भरणार नाही . शेवटची संधी काव्य संमेलनाला बक्षीस आणा नाही तर कायम कविता लिहिनं बंद अशी तंबी बायकोने दिल्याचे प्रसंग सांगत उपस्थितांना कविता आणि कवीला प्रेरणा कशी मिळते हे विविध उदाहरणं देऊन पटवून दिले.
या कार्यक्रमाला श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रास्तविक अनिल कुवर यांनी केले.रतिलाल सामुद्रे यांनी परिचय करुन दिला.सूत्रसंचालन कवी सुनील पाटोळे यांनी तर आभार केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक फोरम,प्रशिक बहुउद्देशीय मंडळ, समता युवा मंच, पंचशील मित्र मंडळ आदींचे सहकार्य लाभले.