नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती ही गो हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा जि. प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित व नामवंत हृदय शल्य विशारद डॉ. प्रसाद अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मान्यवरांचे हस्ते प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना महामारी नंतर आयोजित पहिला पारितोषिक वितरण सोहळा हायस्कूलमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन ॲड. रमणलाल शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, हृदयरोग तज्ञ डॉ.नूतन शाह,श्री मनीष शाह, डॉ. पूजा अंधारे,सौ पायल उधानी,मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह,प्रा.चंद्रकांत सोनवणे,सौ.मीनाक्षी भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते एस.एस.सी व एच.एस.सी. तसेच इतर उपक्रम आणि स्पर्धांमध्ये पारंगत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्याध्यापक सौ सुषमा शाह यांनी आपल्या प्रास्ताविकातून शैक्षणिक वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. शाळेने देशासाठी उपयोगी ठरणारे विद्यार्थी घडविल्याचा त्यांनी उल्लेख केला. शाळेत जीवन शिक्षण व स्वावलंबी जगण्याचे धडे दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेचे माजी विद्यार्थी तथा प्रमुख अतिथी डॉ.प्रसाद अंधारे यांनी शालेय वातावरणात आपण घडलो असल्याचा उल्लेख करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केवळ गणित विज्ञानात विज्ञानाचा अभ्यास करणारे विद्यार्थी यशस्वी होतात असे नाही तर सर्वच विषयांना न्याय देत आपले गुण कौशल्य जो वाढवतो तेच पुढील आयुष्यात यशस्वी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय दशेत स्काऊटच्या माध्यमातून आपल्याला विविध कौशल्यांची प्रशिक्षण मिळाले. कौशल्य प्रशिक्षणातूनच खऱ्या अर्थाने ब्रेन ट्रेनिंग मिळते व मेमरी डेव्हलप होते असल्याचे त्यांनी सांगितले.
जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर या पुस्तकाचे वाचन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. परीक्षेवर मात कशी करायची,भीती नष्ट कशी करावी याचे उत्तम मार्गदर्शन पुस्तकातून मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले.होतकरू खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी होईल ती सर्व प्रकारची मदत देण्याचा आपला प्रयत्न असतो. महाराष्ट्राच्या धावपटू कविता राऊत यांना चांगल्या ट्रेनरची आवश्यकता होती. खा. डॉ. हिना गावित यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे त्यांना प्रशिक्षक मिळवून दिल्यामुळेच कॉमनवेल्थ खेळात त्यांना चमकदार कामगिरी करता आल्याचा उल्लेख डॉ.सुप्रिया गावी त्यांनी केला.
शैक्षणिक वर्षात विज्ञान, क्रीडा, स्काऊट, संगीत,शिक्षण आदींमध्ये विविध पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक व शिक्षकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
दीप प्रज्वलनाप्रसंगी योगेश शास्त्री यांनी दिप स्तोत्राचे गायन केले. तर ईशस्तवन, स्वागत गीत सौ.अनघा जोशी यांच्या पथकाने सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश शाह पर्यवेक्षक, विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, महेंद्र सोमवंशी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा..गणेश पाटील यांनी तर अतिथी परिचय प्रा. प्रशांत बागुल यांनी केला. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक राजेश शहा यांनी केले.